(अहिल्यानगर)
जिल्ह्यात बिबट्या आणि मानव यांच्यात वाढत चाललेला संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. अहिल्यानगर वन विभाग आणि पुण्यातील डी.ए.डी.ए. रिसर्च फाऊंडेशन संचलित ‘डावेल लाईफसायन्सेस’ यांनी संयुक्तपणे ‘AI वाईल्ड नेत्रा’ ही स्वदेशी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम विकसित केली आहे. हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवला जात असून, तो नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
परंपरागत गस्त घालणे किंवा पिंजरे लावणे या उपायांपलीकडे जाऊन ही प्रणाली काम करते. या यंत्रणेत प्रगत कॉम्प्युटर व्हिजन आणि डीप लर्निंग अल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. सामान्य सेन्सर वाऱ्यामुळे हलणारी पिके किंवा कुत्र्यांच्या हालचालींवरही सक्रिय होतात. मात्र ‘AI वाईल्ड नेत्रा’मधील अल्गोरिदम भारतीय बिबट्याच्या शरीररचनेवर विशेष प्रशिक्षण घेतलेले असल्याने, केवळ बिबट्याची खात्रीशीर ओळख पटल्यावरच प्रणाली कार्यान्वित होते.
बिबट्याप्रवण क्षेत्रे अनेकदा दुर्गम आणि मोबाईल नेटवर्कपासून दूर असतात. त्यामुळे इंटरनेटवर अवलंबून असलेल्या प्रणाली अपयशी ठरतात. ही अडचण दूर करण्यासाठी ‘AI वाईल्ड नेत्रा’मध्ये एज कम्प्युटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कॅमेऱ्याने टिपलेला डेटा थेट उपकरणावरच प्रक्रिया केला जातो. त्यामुळे बिबट्या आढळताच तत्काळ सायरन वाजतो आणि याबाबत कोणताही विलंब होत नाही.
वनपरिक्षेत्र कार्यालय, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या मौजे कामरगाव येथे 23 डिसेंबर रोजी ही यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेत ‘अॅडव्हान्स कॅम्प्युटर व्हिजन’ व ‘डिप लर्निंग’ या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. बिबट या वन्यप्राण्याचा डेटाबेस या उपकरणात जतन करण्यात आला आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर बिबट्या आल्यास ही यंत्रणा तात्काळ ॲक्टिव्हेट होऊन सायरनद्वारे नागरिकांना धोक्याचा इशारा देते. यामुळे नागरिकांना सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना करणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय काम करते.
ही प्रणाली सौर ऊर्जेवर चालणारी असून उच्च क्षमतेची बॅटरी व्यवस्थापन प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे ती चोवीस तास कार्यरत राहू शकते. ऊस शेती, पावसाळी वातावरण आणि प्रतिकूल हवामानातही टिकून राहण्यासाठी ही यंत्रणा मजबूत बनवली आहे. गरज भासल्यास ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना अहिल्यानगर वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल म्हणाले, “बिबट्या–मानव संघर्ष व्यवस्थापनात आपण आता प्रतिक्रियात्मक भूमिकेतून प्रतिबंधात्मक भूमिकेकडे जात आहोत. नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, हा आमचा उद्देश आहे. या एआय प्रणालीमुळे केवळ तात्काळ इशारा मिळणार नाही, तर बिबट्यांच्या हालचाली आणि वर्तनाचा अचूक डेटा देखील उपलब्ध होईल.”
हा प्रकल्प सध्या प्रायोगिक टप्प्यात असून, त्याच्या यशासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांनी या यंत्रणेला सहकार्य करावे तसेच आपल्या सूचना आणि अभिप्राय वन विभागाकडे नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात नेटवर्क सुविधा उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना थेट व्हॉट्सॲपवर अलर्ट आणि एसओएस संदेश पाठवण्याची सुविधा सुरू करण्याचा वन विभागाचा मानस आहे.

