(नागपूर)
राज्यात वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने व्यापक आणि तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. “भविष्यात एकही मनुष्य वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणार नाही”, या उद्दिष्टासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली. राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर वनमंत्री नाईक यांनी ही माहिती सविस्तर दिली.
नाईक म्हणाले की, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. बिबट्या हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची १ अंतर्गत येत असल्याने तातडीची कार्यवाही करण्यास कायदेशीर मर्यादा आहेत. त्यामुळे बिबट्यांचा समावेश अनुसूची १ मधून अनुसूची २ मध्ये करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
बिबट्यांच्या नसबंदी प्रक्रियेला वेग
केंद्रीय वन विभागाने राज्यातील पाच बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी दिली असून संबंधित कार्यवाही सुरू झाली आहे. पुढील सहा महिन्यांत मिळणाऱ्या अहवालानंतर आणखी बिबट्यांच्या नसबंदीचा विस्तृत प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे नाईकांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे सुरू असलेल्या बिबट्या बचाव केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अहिल्यानगरमध्ये नवीन बचाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मानव–बिबट्या संघर्ष क्षेत्रात 1200 पिंजरे पुण्यात, आणि मोठ्या प्रमाणात नाशिक व अहिल्यानगरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून भविष्यात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यास तातडीने पिंजरे पुरविण्यासाठी विभागाला आदेश दिले आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर
बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ग्रामस्थांना योग्यवेळी सतर्क करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा तयार करण्यात आली आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या भागातील शाळांच्या वेळात बदल करण्यात आल्याचेही नाईकांनी सांगितले. तसेच बहुविभागीय गस्त पथके आणि स्थानिक तरुणांची मदत घेतली जात आहे. गृह, वन आणि महसूल विभागांच्या संयुक्त गस्त पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकात अधिकाधिक स्थानिक तरुणांना सहभागी करण्याची योजना आहे. वन्यजीवांना जंगलातच पुरेसे खाद्य मिळावे यासाठी उपाययोजना सुरू असून जंगलाच्या सीमांवर बांबूचे कुंपण लावण्याचे नियोजन आहे. नाईक पुढे म्हणाले, मानव–वन्यजीव संघर्ष हा गंभीर प्रश्न असून यावर सर्व विभागांचे समन्वयाने उपाय आवश्यक आहेत. त्यामुळे लवकरच सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील.

