(नवी दिल्ली)
दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 च्या चौथ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. एआयचा वेग आणि विस्तार अकल्पनीय असल्याचं सांगत, “भावी पिढ्यांसाठी आपण कोणत्या प्रकारचं एआय सोडून जात आहोत, याचा गंभीरपणे विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असं मोदी म्हणाले.
एआयच्या क्षेत्रात मोठी स्वप्न पाहणं गरजेचं आहे, मात्र तेवढ्याच जबाबदारीनं, असं स्पष्ट करत त्यांनी सांगितलं की सध्या एआयसह आपण काय करत आहोत आणि त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे, याचा आढावा घेतला पाहिजे. भूतकाळातील अणुऊर्जेच्या उदाहरणाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, विनाशही पाहिला आहे आणि त्यावर उपायही शोधले आहेत. त्यामुळे एआयच्या बाबतीतही शहाणपणाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
या जागतिक शिखर परिषदेला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी संबोधित केलं. 16 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या पाच दिवसांच्या या परिषदेत 110 हून अधिक देश सहभागी झाले असून 20 पेक्षा जास्त देशांचे प्रमुख, 30 आंतरराष्ट्रीय संस्था आणि 500 हून अधिक जागतिक एआय नेते उपस्थित आहेत. यामध्ये सुमारे 100 सीईओ व संस्थापक, 150 शैक्षणिक व संशोधक, 400 सीटीओ आणि 100 हून अधिक सरकारी प्रतिनिधींचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 5 ठळक मुद्दे
1) ब्लॅक बॉक्स नव्हे, ग्लास बॉक्स एआय
एआय प्रणाली पारदर्शक असाव्यात, अशी भूमिका मोदींनी मांडली. एआय हे ‘ब्लॅक बॉक्स’सारखं न राहता ‘ग्लास बॉक्स’सारखं असावं, म्हणजे त्यामध्ये नेमकं काय घडतंय हे स्पष्टपणे दिसायला हवं. यामुळे सुरक्षा नियम तपासता येतील आणि कंपन्यांना जबाबदार धरता येईल.
2) डेटासाठी जागतिक, विश्वासार्ह फ्रेमवर्क
“कचरा आत, कचरा बाहेर” या तत्त्वाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की खराब किंवा असुरक्षित डेटावर प्रशिक्षित एआय धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे डेटा सार्वभौमत्वाचा आदर राखत जागतिक स्तरावर विश्वासार्ह डेटा फ्रेमवर्क तयार करणं गरजेचं आहे.
3) ‘पेपर क्लिप समस्या’ आणि मानवी नियंत्रण
एआय मानवी मूल्यांशिवाय काम करू शकत नाही, असा इशारा देताना त्यांनी ‘पेपर क्लिप समस्या’चं उदाहरण दिलं. एखाद्या यंत्राला फक्त एक मर्यादित उद्दिष्ट दिलं, तर ते साध्य करण्यासाठी संपूर्ण जगाची संसाधनं वापरू शकतं. त्यामुळे तंत्रज्ञानावर अंतिम नियंत्रण मानवाचंच असलं पाहिजे.
4) भारताचं AI मिशन: 6 महिन्यांत 24,000 नवीन GPU
भारत एआय क्षेत्रात वेगाने पुढे जात असल्याचं सांगत मोदींनी माहिती दिली की सध्या देशात 38,000 GPU उपलब्ध आहेत. पुढील सहा महिन्यांत आणखी 24,000 GPU जोडले जाणार आहेत.
5) एआय हे सेवेचं साधन, सत्तेचं नाही
भारतासाठी तंत्रज्ञान म्हणजे सत्ता मिळवण्याचं शस्त्र नसून, जनतेच्या सेवेसाठीचं साधन आहे, असं मोदींनी ठामपणे सांगितलं. UPI आणि CoWINची उदाहरणं देत त्यांनी स्पष्ट केलं की जसं डिजिटल दरी कमी करण्यात यश मिळालं, तसंच एआयही जागतिक दक्षिण, म्हणजे विकसनशील देशांपर्यंत पोहोचायला हवं. एआयचा उद्देश नफा नव्हे, तर मानवतेचं कल्याण असलं पाहिजे.
ही परिषद जागतिक पातळीवर एआयच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारी ठरत असून, भारताची जबाबदार आणि समावेशक एआयविषयीची भूमिका अधोरेखित करत आहे.

