(पुणे)
नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची आज ( गुरुवारी ) विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात न्यायालयाने आरोप निश्चित केले असून, आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकरणात आरोपीला प्रथमच प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांकडून आरोप निश्चितीला विरोध करण्यात आला. मात्र, तपास यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीवर आरोप निश्चित केले.
घटनेनंतर अवघ्या १५ दिवसांत पोलिसांनी चार्जशीट दाखल केली होती. तसेच, केवळ २८ दिवसांत आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत तपास जलदगतीने पुढे नेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील वैद्यकीय अहवाल, डीएनए तपासणी, सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आली. त्यासंदर्भातील सर्व माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे.
दरम्यान, पुढील सुनावणी आता ‘इन कॅमेरा’ पद्धतीने दररोज होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खटल्यातील संवेदनशील बाबी गोपनीय ठेवून सुनावणी प्रक्रिया पार पडणार आहे.
आरोपी भीमराव कांबळे याच्यावर ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ अंतर्गत कलम १०३(१), ६४, ६५(२), ७४, १३७(२), १४०(१) तसेच ‘पोक्सो’ कायदा २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८ आणि १२ अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

