(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ज्येष्ठ शिक्षक मा. सुशील तानू जाधव यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्याबाबत सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक, नाटककार, निवेदक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी बहुआयामी ओळख असलेल्या जाधव यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीवेची पेरणी केली. विद्यार्थ्यांशी आत्मीयतेचे नाते जपत त्यांनी शिक्षणाला केवळ पुस्तकी चौकटीत न ठेवता व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम बनवले. त्यांच्या अध्यापनशैलीमुळे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान निर्माण केले आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच रंगभूमीशीही त्यांचे घट्ट नाते राहिले आहे. ते स्वतः एक सक्षम नाटककार असून विविध सामाजिक आशय असलेल्या नाटकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेली नाटके प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी ठरली आहेत. समाजप्रबोधन, वास्तववादी मांडणी आणि प्रभावी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये मानली जातात.
याशिवाय, आपल्या खुमासदार शैलीत आणि ओघवत्या शब्दफेकीत प्रेक्षकांना कार्यक्रमात खिळवून ठेवणारा निवेदक म्हणूनही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मंचावरील त्यांची सहजता, प्रसंगानुरूप विनोदबुद्धी आणि प्रभावी सादरीकरणामुळे विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांना त्यांनी वेगळी उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला कृतज्ञता सोहळा येत्या ३० मे २०२६ रोजी रत्नागिरी येथील अंबर हॉलमध्ये पार पडणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन समर्थ रंगभूमी, जागृत फाउंडेशन, रत्नागिरी तसेच शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले असून, एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जात आहे.

