कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण अधिक सुलभ करणाऱ्या कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिजचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यात पोहोचले आहे. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेला हा सुमारे १७५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत लोकार्पणासाठी सज्ज होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा पूल छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून, यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासाचे अंतर सुमारे ४० किलोमीटरने कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे १०५ गावांतील नागरिकांसह मुंबईस्थित चाकरमान्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात या पुलाचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला गती दिली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन तसेच दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला हा पूल शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाचे काम करण्यात आले असून, टी अँड टी कंपनीने गेल्या तीन वर्षांत हा प्रकल्प उभारला आहे. मुंबईतील वरळी सी लिंकच्या धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाचा केबल स्टे ब्रिज उभारण्यात आला आहे.
या पुलाची लांबी सुमारे ५४० मीटर असून रुंदी १४.१५ मीटर आहे. पुलाच्या मध्यवर्ती भागात पर्यटकांसाठी ४३ मीटर उंचीची आकर्षक व्ह्यू गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्टची सुविधा उपलब्ध असणार असून, दोन्ही बाजूंनी जिन्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येथून कोयना जलाशयाचे विस्तीर्ण बॅकवॉटर, सह्याद्रीच्या डोंगररांगा तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीसाठी उपयुक्त न ठरता भविष्यात पर्यटनाचेही महत्त्वाचे आकर्षण बनेल.
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील शिवसागर जलाशयावर उभारण्यात आलेल्या या पुलामुळे सोळशी आणि कांदाटी खोरे थेट जोडले जाणार आहे. आहिर-गाढवली परिसरातून कोकणच्या दिशेने जाणारा हा मार्ग दुर्गम भागातील गावांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका आणि सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्राचा भाग यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्याचे अंतर तब्बल ५० किलोमीटरने कमी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच प्रवासातील सुमारे ४० किलोमीटर अंतराची बचत होणार असल्याने वेळ आणि इंधनाचा खर्चही कमी होईल.
विशेषतः पावसाळ्यात दुर्गम भागातील नागरिकांना या पुलाचा मोठा फायदा होणार आहे. सध्या पाण्यातून बार्जच्या साहाय्याने करावा लागणारा धोकादायक प्रवास टाळता येणार आहे. सोळशी आणि कांदाटी खोऱ्यातील १०५ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागण्याबरोबरच कोकण आणि सातारा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मे महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी पुलाची व्हेईकल ट्रायलही घेतली होती. गणेशोत्सवाच्या काळात काही कालावधीसाठी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यावेळी या मार्गाचा नागरिकांना चांगला उपयोग झाला. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोट्या वाहनांसाठी पूल खुला करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता हा पूल कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या अभियंत्यांचाही शासनाकडून गौरव करण्यात आला आहे. महाबळेश्वरचे तत्कालीन उपमुख्य अभियंता अजय देशपांडे यांनी या पुलाचे काम पूर्णत्वास नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचा उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरव केला आहे. राज्यातील एकूण १८ अभियंत्यांचा शासनाकडून सन्मान करण्यात आला असून, उपअभियंता संवर्गातील राज्यातील पाच जणांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये अजय देशपांडे यांच्या कामाचाही विशेष उल्लेख करण्यात आला.
दरम्यान, या पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाट मार्गाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. केबल स्टे ब्रिजमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास सुलभ होणार असला, तरी रघुवीर घाटाचा रस्ता अद्याप धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे या घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


