(मावळ/ पुणे)
शासकीय जनगणनेचे कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिला शिक्षिकेचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे घडली. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. 27 मे रोजी याच शासकीय कामासाठी त्या घरातून निघाल्या होत्या. मात्र, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना कान्हे फाटा परिसरात एका भरधाव कंटेनरने त्यांच्या वाहनाला अत्यंत जोरदार धडक दिली.
मंचर येथील रहिवासी दीपाली सुजित तांबे यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्या शासकीय जनगणनेच्या कामासाठी सकाळी घरातून निघाल्या होत्या. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करत असताना कान्हे फाटा परिसरात भरधाव कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा होता.
धडकेनंतर दीपाली तांबे गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संबंधित कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत
या घटनेनंतर शासकीय कामासाठी प्रवास करणाऱ्या शिक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या वाढत्या तापमानात जनगणनेचे काम करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. शिक्षकांना मोठ्या अंतरावर प्रवास करावा लागत असून महिला शिक्षकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सुरक्षेचे प्रश्न अधिक गंभीर बनले आहेत. अशा कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी कोणतेही ठोस आर्थिक संरक्षण उपलब्ध नाही. शासनाने शिक्षकांसाठी विशेष संरक्षण कवच आणि आर्थिक मदत योजना तातडीने लागू करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे.
शासकीय आदेशानुसार जनगणनेचे काम पार पाडण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण क्षेत्रातूनही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची अधिकृत नोंद केली असून, अपघातानंतर संबंधित कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

