(मुंबई)
नीट (NEET) परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य खासगी शिकवणी शिक्षक वर्ग संचालकांच्या शिखर संघटनेतर्फे बुधवारी मुंबईतील आझाद मैदान येथे एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच खासगी क्लासेस आणि शाळांमधील ‘टायअप’ व्यवस्था कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी आंदोलकांनी सरकारकडे केली.
आंदोलनादरम्यान विविध शिक्षक संघटना आणि खासगी शिकवणी चालकांनी शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या व्यावसायिकीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “शिक्षण हे सेवा क्षेत्र असून ते व्यवसायाचे माध्यम बनू नये,” अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.
इंटिग्रेटेड क्लासेसवर कारवाईची मागणी
अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात फी आकारून सुरू असलेल्या ‘इंटिग्रेटेड क्लासेस’वर विद्यमान कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अनेक शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून केवळ नोंदणी शुल्क घेऊन त्यांना विशिष्ट खासगी क्लासेसशी जोडत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
खासगी क्लासेसची नोंदणी अनिवार्य करा
राज्यातील सर्व खासगी क्लासेसची अधिकृत नोंदणी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. काही शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची केवळ नावनोंदणी करून त्यांना खासगी शिकवणींशी जोडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याची व्यवस्था लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक खासगी क्लासेसमध्ये शिकवून दुहेरी उत्पन्न मिळवत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अशा शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
NEET-JEE साठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था उभारण्याची मागणी
नीट आणि जेईई (JEE) सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुरेशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी खासगी क्लासेसकडे वळतात, असे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे सरकारने धोरणात्मक बदल करून शैक्षणिक संस्थांमध्येच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सक्षम व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली.
‘एक देश, एक बोर्ड, एक अभ्यासक्रम’ची मागणी
शिक्षण व्यवस्थेतील आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी “एक देश, एक बोर्ड, एक अभ्यासक्रम, एक परीक्षा” ही संकल्पना लागू करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. “श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी समान शैक्षणिक धोरणाची गरज आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी
“शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या संस्कारांचा शिल्पकार असतो. जर पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमध्ये शिक्षकांचा सहभाग आढळला, तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली. NEET पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कायदेशीर बंदी आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

