(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळणाचा कणा मानला जातो. मात्र, तळेकांटे–संगमेश्वर ते तूरळ या दरम्यानचा प्रवास सध्या जीवघेणा ठरत असून हा महामार्ग अक्षरशः ‘मृत्यूमार्ग’ बनला आहे. प्रवासी अपघाताच्या भीतीने परमेश्वराची प्रार्थना करीत प्रवास करतात, तर खड्ड्यांच्या तडाख्यामुळे हाडंहाड मोडल्यासारखं होत असल्याने नागरिक व ठेकेदाराविषयी संताप व्यक्त करत आहेत.
खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवास धोकादायक
सदर मार्गावर डांबरीकरणाचे थर उखडून गेले आहेत. काही ठिकाणी मातीचे ढिगारे रस्ता उंचावतात तर ठिकठिकाणी खोलगट खड्डे जीवघेणे ठरत आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते आणखी धोकादायक बनले आहे. धावत्या वाहनांमुळे हे मातीमिश्रित पाणी पादचाऱ्यांवर उडत असल्याने वादावादीचे प्रसंगही वाढले आहेत.
चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग मृत्यूच्या सावलीसारखा ठरत आहे. रात्रीच्या प्रवासात तर अपघाताच्या धोक्याची शक्यता अधिक असते.
पालकमंत्र्यांनाही बसले हेलकावे
या खड्ड्यांचा फटका राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनाही बसला. गेल्या आठवड्यात गुहागरच्या दौऱ्यावर जाताना त्यांच्या वाहन ताफ्यालाही महामार्गावरील खड्ड्यांनी चांगलेच झटके दिले. “सामान्य जनतेचे रोजचे दुःख मंत्र्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं,” असा सूर स्थानिक नागरिकांतून यावेळी उमटला.
खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर काही जखमी व कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. वाहनांचे टायर, इंजिन व इतर भागांचे नुकसान होणे, प्रवासात खोळंबा होणे हे प्रकार आता नेहमीचे झाले आहेत.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, अर्धवट सोडलेले काम, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, पावसाळ्याआधी नियोजनाचा अभाव आणि ठेकेदारांची बेजबाबदार वृत्ती यामुळेच हा महामार्ग ‘मृत्यूमार्ग’ बनला आहे. प्रशासन व संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष ही परिस्थिती अधिकच भयावह करणारी आहे.
पालकमंत्र्यांनी स्वतः हा अनुभव घेतल्यानंतर तरी संबंधित यंत्रणेला जाग येणार का? की पुन्हा खड्ड्यांतच जनतेच्या अपेक्षा गाडल्या जाणार? ठेकदाराला आता तरी जाग येणार का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत. हा मृत्यूचा मार्ग तातडीने दुरुस्त करून सुरक्षित ‘जीवनमार्ग’ बनवावा, अशी जोरदार मागणी सध्या जनतेतून होत आहे.