( मुंबई )
दिशा सालियन प्रकरणात कोणताही हत्या किंवा लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झालेला नसून, तिचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचा स्पष्ट निष्कर्ष वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांवरून निघतो, असा ठाम दावा मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी स्पष्टपणे नमूद केले की, ८ जून २०२० रोजी झालेल्या घटनेच्या वेळी दिशा सालियन हिच्यासोबत तिचा प्रियकर आणि काही मित्र होते. या सर्वांनी दिलेले जबाब सुसंगत असून, त्यामध्ये कोणतेही विसंगती नाही. तसेच, घटनास्थळाचा तपास, शवविच्छेदन अहवाल आणि इतर वैज्ञानिक तपासणीतून हत्येचा किंवा बलात्काराचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असेही पोलिसांनी नमूद केले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वतीने याचिकेत हस्तक्षेपाची मागणी करत न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात, “या प्रकरणात माझे नाव फक्त राजकीय सूडबुद्धीने गोवले गेले आहे. मी प्रतिवादी नसतानाही खोटी आणि निरर्थक याचिका दाखल करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी होणे बाकी असून, सीबीआय चौकशीची मागणी आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.