(कोल्हापूर)
प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि संघर्षमय आयुष्यावर मात करत कोल्हापूर जिल्ह्यातील एकोंडी गावच्या युवा मल्लाने सातासमुद्रापार व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. अक्षय तानाजी ढेरे असे या 23 वर्षीय कुस्तीपटूचे नाव असून त्याच्या यशामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण आहे.
व्हिएतनाममध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत अक्षय ढेरेने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत भारताची मान उंचावली. अंतिम सामन्यात त्याने येलामन आमंगेल्दी याच्यावर 4-2 अशा गुणफरकाने मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या ऐतिहासिक यशानंतर एकोंडी गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
पत्र्याचं घर, एक एकर शेती आणि संघर्षमय आयुष्य
अक्षयच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. हातपाय पसरता येतील इतकंच पत्र्याचं घर, केवळ एक एकर वडिलोपार्जित शेती आणि घरात जनावरांचा राबता अशा परिस्थितीत त्याचं बालपण गेलं. त्याचे वडील तानाजी ढेरे गेली 20 वर्षे एका सहकारी संस्थेत अल्प पगारावर काम करत आहेत. मात्र मुलामध्ये असलेली जिद्द आणि गुणवत्ता ओळखून त्यांनी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घातली. स्वतःसाठी वर्षभरात फक्त एकच ड्रेस खरेदी करणारे वडील अक्षयच्या प्रशिक्षणासाठी मात्र कोणतीही कमतरता भासू देत नव्हते. शेतीसोबत इतरांच्या शेतात मजुरी आणि पशुपालन करून त्यांनी मुलाच्या स्वप्नांना बळ दिलं.
गावच्या तालमीतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंतचा प्रवास
अक्षयला कुस्तीचा वारसा त्याचे आजोबा भाऊ ढेरे आणि वडील तानाजी ढेरे यांच्याकडून मिळाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने गावातील तालमीत कुस्तीचा सराव सुरू केला. पुढे अधिक चांगल्या प्रशिक्षणासाठी त्याने दिंडनेर्ली येथे बाळासो राजगिरे आणि बेळगाव येथे रणजीत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. या प्रशिक्षणासाठी दरमहा जवळपास 10 हजार रुपयांचा खर्च येत होता. मात्र कुटुंबाने कोणतीही तक्रार न करता त्याच्या स्वप्नांना पाठबळ दिलं. दरम्यान, अक्षय भारतीय सैन्य दलात भरती झाला असून सध्या तो पुण्यात सराव करत आहे.
“ऑलम्पिक पदक मिळवल्याशिवाय मिरवणूक नाही”
अक्षयने लहानपणापासून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक पदके आणि गदा जिंकल्या आहेत. गावकऱ्यांनी अनेकदा त्याची मिरवणूक काढण्याचा आग्रह धरला. मात्र “देशासाठी ऑलम्पिक पदक जिंकल्याशिवाय मिरवणूक काढणार नाही,” असा निर्धार अक्षयने केल्याची माहिती त्याची आई वैशाली ढेरे यांनी दिली.
आता लक्ष्य ऑलम्पिक सुवर्णपदकाचं
अक्षयचे वडील तानाजी ढेरे यांनी “आता अक्षयने ऑलम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकावं आणि त्यासाठी तो जीव तोडून मेहनत करेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अक्षय ढेरेने मिळवलेलं हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

