(रत्नागिरी/ वार्ताहर)
रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील कोकणनगर स्मशानभूमीत प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने मृतदेह तब्बल सात तास दाहिनीतच अडकून पडला. याहून संतापजनक बाब म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवण्यात आलेला जनरेटर गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असून, त्यात नेमका बिघाड काय आहे याची साधी माहितीही संबंधित अधिकाऱ्यांकडे नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे मृतकाच्या नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागला असून नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रविवार, २५ मे २०२६ रोजी कै. वसंत वाकडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि आप्तेष्ट कोकणनगर स्मशानभूमीत जमले होते. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पार्थिव विद्युत दाहिनीत सरकवण्यात आले. मात्र, त्याचवेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण प्रक्रिया अर्धवट अवस्थेत थांबली.
या गंभीर परिस्थितीत तातडीने सुरू व्हायला हवा असलेला जनरेटरच बंद अवस्थेत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून जनरेटर नादुरुस्त असून त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यात नेमकी कोणती तांत्रिक अडचण आहे, याची माहितीही पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना देता आली नाही. परिणामी, मृतदेह दाहिनीत अडकून पडला आणि तो बाहेर काढणेही शक्य झाले नाही. अखेर तब्बल सात तासांच्या प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर अंत्यसंस्कार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “मृत व्यक्तीलाही सन्मानाने निरोप देता येत नसेल, तर ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे,” अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. यावेळी जनरेटरची तातडीने दुरुस्ती करावी, स्मशानभूमीत कायमस्वरूपी पर्यायी वीज व्यवस्था उभारावी, तसेच या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांनी मृतकाच्या नातेवाईकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
नगरपरिषदेत निवेदन देताना उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेटे, विभागप्रमुख अमित विलणकर, राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वारेकर, मंदार, अमन राणे आणि गौरव कळंबटे उपस्थित होते.
या संपूर्ण प्रकारामुळे रत्नागिरी नगरपरिषदेच्या मूलभूत सुविधांबाबतच्या अनास्थेचा पर्दाफाश झाला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

