(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती आणि शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. रत्नागिरी शहरातील आंबेडकरवाडी येथील बुद्ध विहारात आयोजित या कार्यक्रमात दहावी, बारावी, पदवी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश रामचंद्र पवार होते, तर आरास अकॅडमी, रत्नागिरीचे करिअर मार्गदर्शक ॲड. राकेश सत्वे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी रत्नागिरीचे माजी पोलीस उपअधीक्षक विलास भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष प्रकाश पवार आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण समितीचे अध्यक्ष जयवंत कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन काशिनाथ तांबे यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. राकेश सत्वे यांनी करिअरच्या विविध संधी, विद्यार्थ्यांची आवड, क्षमता आणि योग्य नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थी आणि पालकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे देत स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे विलास भोसले यांनी शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांच्या बालपणातील प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले.
यानंतर दहावी, बारावी, पदवी तसेच इतर परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भेटवस्तू आणि गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर विद्यार्थी आणि पालकांनी बौद्धजन पंचायत समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात प्रकाश पवार यांनी समितीच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या “शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे” या विचाराचा पुनरुच्चार केला. समाजातील अन्यायाविरोधात एकजुटीने उभे राहण्यासाठी शिक्षणाची ताकद ओळखणे आवश्यक असून, समितीच्या विविध उपक्रमांमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास समितीचे उपाध्यक्ष विजय आयरे, सचिव सुहास कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, शिक्षण समितीचे सचिव काशिनाथ तांबे, महिला मंडळ अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, सचिव दिया कांबळे, संस्कार समितीचे सचिव रविकांत पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सचिव सुहास कांबळे यांनी आभार प्रदर्शनाने झाला.

