(रत्नागिरी / वार्ताहर)
लोणावळ्यात पार पडलेल्या वर्षा मॅरेथॉन २०२६ स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. मानसी मराठे, अजित किंजळे आणि अनंत तानकर यांनी आपापल्या गटात द्वितीय क्रमांक पटकावत यशाची नोंद केली. याचबरोबर रत्नागिरीतील मोठ्या संख्येने धावपटू आणि सायकलपटूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत फिटनेस चळवळीला नवी ऊर्जा दिली.
लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये वाटद-खंडाळा येथील किंजळेवाडीचे अजित अनंत किंजळे यांनी पुरुषांच्या ३१ ते ४० वर्षे वयोगटातील ३५ किलोमीटर शर्यत ४ तास २२ मिनिटांत पूर्ण करत द्वितीय क्रमांक मिळवला. बी.कॉम. पदवीधर असलेले अजित किंजळे बांधकाम आणि आंबा व्यवसाय सांभाळत नियमित धावण्याचा सराव करतात.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी धावण्याला अधिक गांभीर्याने सुरुवात केली. प्रसाद देवस्थळी यांच्यासह अनेक अनुभवी धावपटूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगली कर्ण मॅरेथॉन २०२५, विजेता ग्रुप स्पर्धा तसेच महाड येथील २१ किमी मॅरेथॉनमध्येही द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या कठीण मार्गावर केलेला सराव इतर स्पर्धांमध्ये निश्चितच फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोमेंडी बुद्रुक येथील मानसी मराठे यांनी महिलांच्या ४१ ते ५० वर्षे वयोगटातील ३५ किलोमीटर अंतर ४ तास ३१ मिनिटांत पूर्ण करत द्वितीय क्रमांक पटकावला. यापूर्वीही त्यांनी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, प्रॅक्टिस रनच्या नियोजनात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
दरम्यान, गुहागरचे अनंत तानकर यांनी १० किलोमीटर शर्यत ४५ मिनिटांत पूर्ण करून ४१ ते ५० वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवला. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसह अनेक मॅरेथॉन आणि सायकलिंग स्पर्धांमध्ये त्यांनी यापूर्वीही यश संपादन केले आहे.
लोणावळा वर्षा मॅरेथॉनसाठी धावपटूंना कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केलेले धावपटू अभिजित पड्याळ यांनी विशेष मार्गदर्शन केले. स्पर्धेचा मार्ग, पावसाळी वातावरण, धुके आणि तांत्रिक बाबींबाबत त्यांनी धावपटूंना उपयुक्त सूचना दिल्या.
यंदा रत्नागिरीतील ३० धावपटूंनी लोणावळा वर्षा मॅरेथॉन, १० जणांनी कुडाळ मान्सून मॅरेथॉन, तर ५० सायकलपटूंनी सायकलवारीत सहभाग नोंदवला. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन अंतर्गत आतापर्यंत १०२ प्रॅक्टिस रन यशस्वीपणे पार पडल्या असून, त्यातून तयार झालेले धावपटू राज्यभरातील विविध स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात धावणे आणि सायकलिंग याबाबतची जागरूकता दिवसेंदिवस वाढत असून, फिटनेसकडे तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांचा वाढता कल ही जिल्ह्यासाठी सकारात्मक बाब ठरत आहे.

