(रत्नागिरी / वार्ताहर)
नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाट परिसरात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली असून, या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज रात्री १० नंतर आंबा घाट मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे आहे. जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेला गॅस टँकर मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास आंबा घाटाजवळ पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की चालकाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आंबा महामार्ग पोलिस मदत केंद्र, महामार्ग वाहतूक शाखा आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर ताब्यात घेतला. सध्या कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू असली, तरी अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम आज बुधवारी रात्री १० नंतर हाती घेण्यात येणार आहे.
गॅस रिफिलिंग प्रक्रिया अत्यंत धोकादायक आणि संवेदनशील असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या काळात आंबा घाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातून कोल्हापूरकडे किंवा कोल्हापूरहून कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांनी रात्रीच्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी कोकणाकडे जाणारी वाहतूक अणुस्कुरा घाट मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी गगनबावडा किंवा पाटण मार्गाचा पर्याय वापरावा, असे आवाहन महामार्ग वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. या अपघातामुळे आंबा घाट परिसरात प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

