(रत्नागिरी / लांजा)
जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस येथील संसारी तिठाजवळ ८ मे २०२५ रोजी सापडलेल्या सुमारे एका महिन्याच्या बिबट्याच्या नर पिल्लाची देखभाल वनविभागाने २५ दिवस अत्यंत दक्षतेने केली. यानंतर सदर पिल्लूला मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आले आहे.
सापडलेले पिल्लू स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर, वनपाल लांजा, वनरक्षक लांजा व कोर्ले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पिल्लू थोडे अशक्त असल्यामुळे वनाधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांना याची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लूला आईसोबत पुन्हा भेट व्हावी याकरिता जंगलमय परिसरात ठेवण्यात आले. कॅमेरात बिबट मादी दोन वेळा पिल्लाजवळ आल्याचे दिसून आले, मात्र पुनर्भेट शक्य झाली नाही.
यानंतर डॉ. निखिल बनगर (पशुवैद्यकीय अधिकारी, सातारा वनविभाग) यांच्या निगराणीखाली शासकीय विश्रामगृह लांजा येथे विशेष स्वच्छता आणि खबरदारीसह पिल्लाची देखभाल करण्यात आली. पिल्लास आवश्यक फीडिंग, औषधे, तापमान नियंत्रण यासाठी डॉक्टर, वनपाल, वनरक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या समन्वयातून अहोरात्र प्रयत्न करण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या पुढाकाराने कोल्हापूर वनविभागाच्या थर्मल ड्रोन युनिटद्वारे पिल्लाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र शोधाला यश आले नाही. २ जुलै २०२५ रोजी वनपाल सारीक फकीर व डॉ. निखिल बनगर यांनी बिबट्याच्या पिल्लास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे सुपूर्त केले. सुपूर्त करताना पिल्लू पूर्णतः सुस्थितीत असून वजन, तापमान योग्य असल्याची नोंद करण्यात आली.
या कार्यात वनविभागासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. बिडकर, खानसामे श्री. फोंडेकर व श्री. राप यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. संपूर्ण काळात विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली निगराणी ठेवण्यात आली. वन्यप्राणी संबंधित अशा कोणत्याही घटनांची माहिती टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर देण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

