(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढणारी अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर वाढलेली दुकाने आणि अतिक्रमणांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या संदर्भात पाचलमधील सामाजिक कार्यकर्ते तुषार पाचलकर आणि समीर खानविलकर यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदन देत पाचल बाजारपेठेतील अतिक्रमणांचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर 20 एप्रिल 2026 रोजी मंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांना वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, 13 मे रोजी राजापूर येथे आयोजित जनता दरबारात रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनीही या प्रश्नाची गंभीर दखल घेत संबंधितांना नोटिसा बजावून तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने ग्रामपंचायत पांगरी खुर्द चे प्रशासक अमर जाधव यांनी 26 मे रोजी राजापूर प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत ओणी-अनुस्कुरा मार्गालगत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामे, दुकाने आणि टपऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून वाहनचालक आणि नागरिकांमध्ये वारंवार वाद होत आहेत. काही ठिकाणी तर बांधकामे थेट रस्त्यावर आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग च्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, लवकरच जनआंदोलन उभारण्याचा इशारा माजी सरपंच अमर जाधव यांनी दिला आहे.
स्थानिकांच्या मते, मंत्री, जिल्हाधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या वारंवार सूचनांनंतरही प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे संबंधित विभागावर राजकीय दबाव किंवा संगनमताचे संशय व्यक्त केले जात आहेत. आता प्रशासन खरोखरच अतिक्रमण हटविणार की नागरिकांच्या रोषानंतरच जागे होणार, याकडे संपूर्ण पाचलवासीयांचे लक्ष लागले आहे.

