(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात गॅस वितरण व्यवस्थेत अनियमितता उघडकीस आली असून, पाचल येथील एका गॅस सेवा केंद्रावर भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर ग्राहक कार्डांचा साठा आणि अनधिकृत व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात आला होता. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूरचे तहसीलदार तथा भरारी पथक प्रमुख विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक निलेश सतीश लाड व लिपिक विक्रम पाटील यांनी पाचल परिसरात तपासणी मोहीम राबवली. यावेळी ‘श्री सद्गुरु गॅस सेवा’ या गॅस एजन्सीची झडती घेण्यात आली.
तपासणीदरम्यान दुकानातून भारत गॅस कंपनीचा एक रिकामा व्यावसायिक सिलेंडर आणि तब्बल 1094 ग्राहकांची गॅस कार्डे आढळून आली. या साठ्याबाबत समाधानकारक माहिती न देता आल्याने, संबंधित साहित्य साठेबाजीच्या उद्देशाने अनधिकृतपणे ठेवले असल्याचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पथकाने सर्व साहित्य जप्त केले.
या प्रकरणी पुरवठा निरीक्षक निलेश लाड यांच्या तक्रारीवरून पाचल येथील ‘श्री सद्गुरु गॅस सेवा’चे चालक विलास भिकू कोलते (वय 55, रा. रायपाटण) यांच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती गॅसचा अवैध वापर आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहक कार्डांची साठेबाजी उघड झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

