(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील साखरी-नाटे येथील एका सहा वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी रिसॉर्टवर गेलेल्या या चिमुकल्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हसन सलमान कोतवडकर (वय ६ वर्षे, रा. साखरी-नाटे) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हसन आपल्या कुटुंबीयांसोबत कोतापूर फाटा परिसरातील एका रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी गेला होता. सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास स्विमिंग पूल परिसरात खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
काही वेळाने ही बाब लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने हसनला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
काही क्षणांपूर्वी कुटुंबीयांसोबत आनंदाने खेळणारा हसन अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
प्राथमिक माहितीनुसार, पाण्यात बुडाल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाणे नाटेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजापूर येथे पाठविला असून पुढील तपासासाठी प्रकरण राजापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या दुर्दैवी घटनेमुळे साखरी-नाटे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कोतवडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

