(संगमेश्वर / प्रतिनिधी)
अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला विषारी फुरसे सापाने दंश केल्यानंतर बी. के. एल. वालावलकर रुग्णालय येथील डॉक्टर आणि परिचारिकांच्या तत्पर उपचारांमुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. उपचारानंतर बाळाची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले.
सम्रान सागर गोलांबडे (वय ६ महिने), रा. गोटे बुद्रुक, ता. महाड, जि. रायगड हे बाळ २३ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घरी झोपलेले असताना अचानक मोठ्याने रडू लागले. आई-वडिलांनी जागे होऊन पाहिले असता बाळाजवळ फुरसे (Saw-scaled Viper) जातीचा विषारी साप आढळून आला.
तपासणी केली असता बाळाच्या डाव्या काखेजवळ सर्पदंशाची खूण, रक्तस्त्राव आणि सूज दिसून आली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने बाळाला उपजिल्हा रुग्णालय महाड येथे दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता सर्पविषामुळे गंभीर रक्तविषारी (Hemotoxic) परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी बाळाला बी. के. एल. वालावलकर रुग्णालय येथे हलवण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताच बाळाला अतिदक्षता विभागात (PICU) ठेवण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ प्रतिविष (Anti Snake Venom) उपचार सुरू केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे विषाचा प्रभाव नियंत्रणात आला आणि बाळाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. बी. के. एल. वालावलकर रुग्णालय येथील डॉक्टरांच्या कुशल उपचारांमुळे आणि परिचारिकांच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे अखेर बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले.
या यशस्वी उपचारामध्ये डॉ. अनिल कुर्णे, डॉ. अंकिता सुर्वे, डॉ. मोहित कडू, डॉ. विशाखा संकपाळ, डॉ. पंक्ति मेहता, डॉ. स्वप्नील काळे, डॉ. प्रतीक गोडसे, डॉ. विवेक सूर्यवंशी, डॉ. प्रिया वाघमारे, डॉ. विवेक पवार, डॉ. प्रणय गावंडे आणि डॉ. अजय पाटील यांचे विशेष योगदान राहिले.
फोटो : वालावलकर रुग्णालयातुन उपचार घेतल्यानंतर सहा महिन्याचे बाळ व त्याची आई सोबत रुग्णालयाचे वैद्यकीय पथक

