(देवळे / प्रकाश चाळके)
साखरपा येथील आंतरराष्ट्रीय कँरमपटू आणि महाराष्ट्र शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय कदम हिने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर कारकिर्दीतील 15 वे राज्यस्तरीय विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र कँरम असोसिएशन आणि सिव्हिल फेडरेशन रोटरी क्लब ऑफ बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली येथील मंडपेश्वर सिव्हिल फेडरेशन (एमसीएफ) येथे 23 ते 25 मे 2026 दरम्यान राज्य मानांकन कँरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आकांक्षा उदय कदम हिने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि अप्रतिम खेळीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. उपांत्य फेरीत तिने मिताली पिंपळे हिचा पराभव करून अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला.
अंतिम सामन्यात तिच्यासमोर समृद्धी घाडीगांवकर हिचे आव्हान होते. तीन सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात आकांक्षाने दिमाखदार विजय मिळवत आपल्या कारकिर्दीतील 15 वे राज्यविजेतेपद पटकावले.
आकांक्षा उदय कदम हिला गतवर्षी महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला होता. आता पुन्हा एकदा राज्यस्तरीय विजेतेपद मिळवल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी आकांक्षाचे हे यश अभिमानास्पद मानले जात आहे.

