(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) दुरावस्थेबाबत आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील विविध गैरसोयी आणि आरोग्य सुविधांतील त्रुटींवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली अधिष्ठात्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे रुग्णालयातील सर्व समस्या येत्या आठ दिवसांत मार्गी लावाव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनेने रुग्णालयातील अनेक गंभीर बाबींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. रुग्णालयात एक्स-रे फिल्मचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गरीब रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये जाऊन महागडे एक्स-रे काढावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट असून, टॉयलेट्स तुंबलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आपत्कालीन व अपघात विभागाची अवस्थाही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. गंभीर रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याशिवाय कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांऐवजी कंत्राटी वॉर्ड बॉय नियुक्त करण्यात आल्याने रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचेही पक्षाने म्हटले आहे.
रुग्णालय परिसरातील पार्किंग व्यवस्थेवरही शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतीही शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था नसल्याने रुग्णवाहिकांच्या येण्या-जाण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेटे, अमित विलणकर, विभागप्रमुख राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वारेकर, मंदार, अमन राणे आणि गौरव कळंबटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सर्वसामान्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ प्रशासनाने तात्काळ थांबवावा आणि रुग्णालयातील समस्या युद्धपातळीवर सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

