(खेड)
भरणे गावावर रविवारी दुपारी अक्षरशः शोककळा पसरली. देवी काळकाई मंदिराच्या कळसावर स्वच्छतेसाठी गेलेल्या रमेश बाळा फागे (42, भरणे-फागेवाडी) यांचा तोल जाऊन खाली पडून जागीच मृत्यू झाला. ऐन नवरात्रोत्सवाच्या उंबरठ्यावर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने गावात स्वच्छतेची लगबग सुरू होती. मंदिर स्वच्छतेची जबाबदारी वाडीनिहाय पाळीनुसार देण्यात आली होती. रविवारी फागेवाडी व जाधववाडीची पाळी होती. दुपारी मंदिराच्या कळसावर स्वच्छतेचे काम सुरू असताना रमेश यांचा तोल गेला आणि क्षणातच काळाने आपलं काम केलं. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
रमेश फागे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने फागे कुटुंबावर दुःखाचा काळा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांनी संध्याकाळी अश्रूंच्या धारा आणि हुंदक्यांमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. गावाच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या देवी काळकाईच्या नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाला आहे.

