(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गावरील कामांमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी मोऱ्यांची उभारणी करण्यात आली असली, तरी त्याचबरोबर महामार्गालगत वॉटर हार्वेस्टिंगसाठी तयार करण्यात आलेले भलेमोठे खोलगट खड्डे आता नागरिकांसह जनावरांच्या जीवावर उठणार असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पावसाळा तोंडावर असताना या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहणार असून, पावसाळ्यात मोठ्या अपघातांना निमंत्रण देणारी धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने पाण्याच्या निचऱ्याच्या नावाखाली रस्त्यालगत खोल खड्डे तयार करण्याचा “नवा शोध” लावल्याची उपरोधिक टीका स्थानिक नागरिकांकडून होत आहे. हातखंबा ते रत्नागिरीदरम्यान महामार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असतो. मोठी वाहने, अवजड ट्रक, खासगी बस आणि भरधाव कार यामुळे छोट्या वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यालगत खोल खड्डे तयार करून अपघातांचा धोका आणखी वाढवला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. विकासकामे ही नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारी असावीत. भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्यांचाही विचार प्रशासनाने करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि सुरक्षित निचरा व्यवस्था उभारल्यास नागरिकांना भविष्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असा सूर आता उमटू लागला आहे.
महामार्गालगत वॉटर हार्वेस्टिंगसाठी जीवघेणे खड्डे तयार करून गेली कित्येक दिवस तशाच स्थितीत ठेवण्यात आले आहेत. पाण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन अधिक आवश्यक असले तरी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक उतार, मजबूत मोऱ्या, सिमेंट नाले आणि सुरक्षित ड्रेनेज व्यवस्था उभारण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे पाण्याचा निचरा प्रभावीपणे होऊ शकतो. सध्या तयार करण्यात आलेले वॉटर हार्वेस्टिंगचे खोलगट खड्डे भविष्यात मोठ्या संकटाला आमंत्रण देणारे ठरू शकतात. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यास रस्त्याच्या कडेला नेमकी किती खोली आहे, याचा अंदाज वाहनचालक, पादचारी किंवा जनावरांना येणे कठीण होणार आहे. याच स्थितीत एखादा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा भीतीपोटी सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड प्रोजेक्ट या कंपनीने तयार केलेल्या भल्यामोठ्या खोलगट खड्ड्यात माणूस किंवा जनावरे पडल्यास त्याला जबाबदार कोण? असा थेट प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महामार्गाचे काम सुरू असताना सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि ठेकेदार कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी, अशी आता मागणी जोर धरू लागली आहे.
पावसाळ्यापूर्वी वॉटर हार्वेस्टिंगचे कामकाज तातडीने पूर्ण करावे
महामार्गालगत तयार करण्यात आलेले खोलगट खड्डे केवळ वाहनचालकांसाठीच नव्हे, तर रस्त्याच्या कडेला फिरणाऱ्या मुक्या जनावरांसाठीही मोठा जीवघेणा धोका बनले आहेत. गाव परिसरात गायी, बैल, म्हशी तसेच इतर जनावरे नेहमीच रस्त्याच्या बाजूने फिरताना दिसतात. मात्र, सध्या तयार करण्यात आलेल्या खोल खड्ड्यांमध्ये एखादे जनावर पडल्यास त्याला पुन्हा बाहेर येण्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था किंवा उतार ठेवण्यात आलेला नाही. विशेषतः रात्रीच्या अंधारात किंवा पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर या खड्ड्यांचा अंदाज जनावरांना येणे अशक्य होणार आहे. परिणामी एखादे जनावर थेट खोल खड्ड्यात कोसळल्यास गंभीर दुखापत किंवा जागीच मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वॉटर हार्वेस्टिंगचे कामकाज तातडीने हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी देखील केली जात आहे.

