(खेड/ रत्नागिरी)
साड्या धुण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या ८० वर्षीय वृद्धेचा मृतदेह दोन दिवसांनंतर जगबुडी नदीच्या पात्रात आढळून आल्याने खेड परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी गोविंद भोसले (वय ८०, रा. महाडनाका, ता. खेड) असे मृत वृद्धेचे नाव आहे. गुलमोहर पार्क परिसरातील नदीपात्रात मंगळवारी (३ नोव्हेंबर) सकाळी त्यांचा मृतदेह आढळला.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी भोसले या स्वतःच्या साड्या धुण्यासाठी घरातून बाहेर पडून जगबुडी नदीवर गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत १ नोव्हेंबर २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचा शोध घेत असताना गुलमोहर पार्क परिसरातील जगबुडी नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाण्यात पालथ्या स्थितीत होता. तसेच शरीरातून दुर्गंधी येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ९३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. वृद्धेचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.


