(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मासेमारीसाठी खाडीत गेलेल्या एका ५४ वर्षीय प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवरे परिसरात उघडकीस आली आहे. संजय अनंत गावडे (रा. ढोकमळे-नेवरे, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय गावडे हे रविवारी (२४ मे) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ढोकमळे-नेवरे येथील काजिरभाटी समुद्रकिनारी मासेमारीसाठी गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती. रात्रभर त्यांचा काहीच संपर्क न झाल्याने सोमवारी सकाळी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. अखेर सकाळी साडेदहाच्या सुमारास नेवरे खाडीकिनारी संजय गावडे हे निपचित अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

