(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील कुवारबाव-साईनगर परिसरात सहा दिवसांपूर्वी घडलेल्या सूरज राजाराम झोरे (२५) यांच्या निर्घृण हत्याकांडाच्या तपासात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या रक्तरंजित घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेली मुख्य संशयित आरोपी सोहम म्हात्रे याची मैत्रीण मंगळवारी सकाळी रत्नागिरीत दाखल झाली. शहर पोलिसांनी सायंकाळी तिला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा करत तपासाला वेग दिला.
या खळबळजनक प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सोहम एकनाथ म्हात्रे (१८, रा. शांतीनगर-रसाळवाडी), अभिषेक देवानंद राठोड (२२, रा. आदिनाथ नगर झोपडपट्टी) आणि नजीबुल शेख ऊर्फ सोनू (२१, रा. शांतीनगर-रसाळवाडी) या तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सोहम म्हात्रे आणि मृत सूरज झोरे यांच्यात वर्षभरापूर्वी आर्थिक व्यवहारातून वाद झाला होता. त्यानंतर सूरज हा सातत्याने सोहम आणि त्याच्या वडिलांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करत होता. एवढेच नव्हे, तर सोहमच्या मैत्रिणीला त्याच्याविरोधात भडकवण्याचाही प्रयत्न सूरज करत असल्याचा संशय सोहमच्या मनात निर्माण झाला होता. हीच खदखद मनात ठेवून सोहमने सूरजचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी रात्री सोहमने सूरजला कुवारबाव-साईनगर येथील एका बंगल्याच्या मागील बाजूस बोलावून घेतले. सूरज तेथे पोहोचताच सोहम आणि त्याच्या साथीदारांनी सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मानेवर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्याने सूरज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी जखमी अवस्थेतील सूरजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मृत्यूशी झुंज देत असतानाच सूरजने पोलिसांना आरोपींची नावे सांगितली. त्याच्या या मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.
या संपूर्ण घटनेवेळी मुख्य आरोपी सोहमची मैत्रीण घटनास्थळी उपस्थित होती. हल्ल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने तिचा शोध घेतला असता ती मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला रत्नागिरीत हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्याप्रमाणे ती मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाली असून पोलिसांनी तिच्याकडून सविस्तर चौकशी सुरू केली आहे. सायंकाळी तिला घटनास्थळी नेऊन पंचनामा करण्यात आला. तिच्या जबाबातून या हत्याकांडातील आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

