( संगमेश्वर / एजाज पटेल )
संगमेश्वर तालुक्यातील डोंगराळ आणि ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, आता गव्यांचे कळप थेट मुख्य रस्त्यांवर दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनवडे-कोसुब घाटी मार्गावर भरदिवसा तब्बल १० ते १२ गवे रेडे आणि एका पाडसाने मुख्य रस्त्यावर ठाण मांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मुचरी येथील रहिवासी योगेश सप्रे हे आपल्या स्कूटरने देवरुखच्या आठवडा बाजारासाठी जात असताना कोसुब बौद्ध वाडीनजीकच्या तीव्र वळणावर अचानक त्यांच्या समोर गव्यांचा मोठा कळप उभा ठाकला. समोर अवाढव्य गवे पाहताच क्षणभर त्यांची घाबरगुंडी उडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ गाडी थांबवत शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेतला.
विशेष म्हणजे, गव्यांचा कळपही काही वेळ रस्त्यावरच उभा राहून सप्रे यांच्या दिशेने पाहत होता. अत्यंत तणावपूर्ण वातावरणातही योगेश सप्रे यांनी धीर न गमावता सुरक्षित अंतरावरून या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे मोबाईलमध्ये कैद केली.
गव्यांचा ‘रस्ता रोको’; वाहनधारकांना माघार घ्यावी लागली
सोनवडे-कोसुब घाटी मार्ग हा परिसरातील महत्त्वाचा संपर्क मार्ग मानला जातो. मात्र, गव्यांचा कळप रस्त्याच्या मध्यभागी बराच वेळ उभाच राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. वन्यप्राण्यांचा स्वभाव अनिश्चित असल्याने आणि धोका वाढत असल्याचे लक्षात घेऊन योगेश सप्रे यांनी काही अंतर माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मागून येणारे शाम किंजळे यांना त्यांनी पुढील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर दोघांनीही धाडस दाखवत पुन्हा घटनास्थळी जाऊन मोठ्याने आवाज करत गव्यांना जंगलाच्या दिशेने हुसकावण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर मानवी आवाजामुळे गव्यांचा कळप बिथरला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
दुचाकीस्वारांनी सावध राहण्याचे आवाहन
या घटनेनंतर संपूर्ण सोनवडे-कोसुब घाटी परिसरात गव्यांच्या वाढत्या वावराबाबत चर्चा सुरू झाली आहे. घाटी मार्ग अरुंद, वळणावळणाचा आणि दाट जंगलातून जात असल्याने अचानक वन्यप्राणी समोर येण्याचा धोका कायम असतो. सुदैवाने योगेश सप्रे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी वाहनधारकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना घाटी मार्गावर सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. वळणांवर वाहनांचा वेग कमी ठेवावा आणि रात्री अथवा पहाटेच्या वेळेत अधिक सतर्क राहावे, असेही सांगण्यात येत आहे.

