( रत्नागिरी /प्रतिनिधी )
देवरुखहून विवाह सोहळा आटोपून परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघाताने हातखंबा बौद्धवाडीवर कोसळलेले दुःखाचे सावट अखेर आणखी गडद झाले आहे. या अपघातात यापूर्वीच दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या विकास चंद्रकांत कांबळे याची गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर शनिवारी (१२ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास संपली. मुंबईतील कांदिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. या दुर्घटनेतील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
हातखंबा येथील तरुण देवरुख येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. रविवारी (२६ एप्रिल) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते दुचाकीवरून परतत असताना पांगरी येथील धोकादायक वळणावर दुचाकीवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर विकास चंद्रकांत कांबळे हा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी विकास याला तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर एकापाठोपाठ दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, अपघातानंतर तो कोमात होता. उपचारांनंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईला हलविले. ठाणेनंतर कांदिवली येथील खासगी रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नियतीपुढे कुटुंबीयांची सारी धडपड व्यर्थ ठरली आहे.
विकास हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघातानंतर त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अक्षरशः शर्थीचे प्रयत्न केले. गेल्या सहा महिन्यांपासून प्रत्येक दिवस आशेवर काढणाऱ्या कुटुंबीयांना अखेर शनिवारी सकाळी आलेल्या या दुर्दैवी वार्तेने मोठा धक्का बसला. ‘विकास आता आपल्यात नाही’ या वास्तवावर विश्वास ठेवणेही अनेकांसाठी कठीण झाले. मुंबई येथील त्याच्या निवासस्थानी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. या वेळी मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘डान्सर विकास’ची आठवण कायम राहणार
विकास चंद्रकांत कांबळे याची ओळख केवळ मित्रपरिवारापुरती मर्यादित नव्हती. तो एक उत्तम नृत्यकलाकार म्हणूनही परिचित होता. विशेषतः लहान मुलांशी सहज संवाद साधत, त्याच्या भाषेत गप्पा-गोष्टी करत त्यांना नृत्याची गोडी लावणे आणि स्पर्धांसाठी तयार करणे, ही त्याची वेगळीच शैली होती. लहान मुलांना नृत्य शिकविताना तो केवळ त्यांना स्टेप्स शिकवत नसे, तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचा. स्वतः नृत्य करत मुलांचा उत्साह वाढवायचा. त्यामुळे त्याच्याशी जोडलेली अनेक मुलेही आज आपल्या ‘विकास दादाला’ शोधत आहेत. सोशल मीडियावर उमटणाऱ्या श्रद्धांजलीच्या शब्दांतून त्याच्याशी जोडलेल्या नात्यांची घट्ट वीण जाणवते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणारा त्याचा स्वभाव अनेकांच्या मनात घर करून गेला होता. त्यामुळे विकासच्या निधनाची वार्ता कळताच सोशल मीडियावर त्याच्या आठवणींना उजाळा देत मित्रपरिवार आणि परिचितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. मिस यू विकास दादा… मला सोडून का गेलास? आता माझ्या मनातल्या गोष्टी मी कोणाला सांगू? आम्हाला डान्स कोण शिकवणार? चांगल्या मार्गावर कोण नेणार?’ अशा भावनिक शब्दांत व्यक्त होणाऱ्या श्रद्धांजलीतून विकासने मागे ठेवलेली माणुसकीची आणि आपुलकीची नाती देखील आता अधोरेखित होत आहेत.
एका अपघाताने तीन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त
पांगरीच्या त्या धोकादायक वळणावर घडलेल्या एका अपघाताने तीन तरुणांचे आयुष्य हिरावून घेतले. दोन ‘विकास’ आणि एक ‘सुमित’ असे तीन तरुण चेहरे आता केवळ आठवणींत उरले आहेत. अवघ्या तरुण वयात तिघांनीही जगाचा निरोप घेतल्याने हातखंबा बौद्धवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सहा महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या विकासच्या जाण्याने या अपघाताची वेदना पुन्हा एकदा ताजी झाली आहे. एका बाजूला दोन तरुणांचा घटनास्थळीच अंत, तर दुसऱ्या बाजूला सहा महिन्यांची प्रदीर्घ झुंज आणि त्यानंतर आलेला मृत्यू… या संपूर्ण दुर्घटनेने तीन कुटुंबांना आयुष्यभराची न भरून येणारी पोकळी दिली आहे.


