(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील पाली येथे असलेल्या Eagle Infra कंपनीच्या प्लांटवर ५० लिटर डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, या प्रकरणी कंपनीत कार्यरत असलेल्या तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्लांट प्रभारी राजेशकुमार देवीदयाल यादव यांच्या फिर्यादीवरून हर्षितकुमार श्रीराम पांडवे, कमल दिलीप उपाध्याय आणि अब्दुल बुद्ध हुसेन रेहगान (सर्व रा. पाली, ता. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही घटना १ मार्च २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. प्लांटमधील स्टोअर्स विभागात कार्यरत असतानाच संबंधितांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ५० लिटर डिझेल लबाडीच्या हेतूने चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, संशयास्पद हालचाली वेळीच लक्षात आल्याने संभाव्य आर्थिक नुकसान टळले.
दुपारी साडेएकच्या सुमारास यादव यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०६, ६२ व ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२/२०२६ प्रमाणे नोंदविला आहे. विश्वासाने जबाबदारी सोपविलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच कंपनीच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्याने औद्योगिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत असून, नेमका प्रकार कशा पद्धतीने उघडकीस आला याबाबत अधिक माहिती संकलित केली जात आहे.

