( लांजा )
लांजा तालुक्यातील भांबेड गावचे सुपुत्र आणि सामाजिक, सांस्कृतिक तसेच कलाक्षेत्रात सक्रिय असलेले अमोल रेडीज यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्यांच्या या यशामुळे लांजा तालुक्यासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अमोल रेडीज हे केवळ अभिनेते म्हणूनच नव्हे, तर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांमधील सक्रिय पदाधिकाऱ्यांमुळेही परिचित आहेत. ते बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्लीचे अध्यक्ष असून अमोल रंगयात्री लांजा, नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड आणि व्यापारी संघटना भांबेड या संस्थांचे संस्थापक आहेत. तसेच श्रीराम विद्यालय वेरवलीच्या शालेय व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, लांजा तायक्वांडो अकादमीचे उपाध्यक्ष आणि जिल्हा कलाकार मानधन समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.
यापूर्वीही अमोल रेडीज यांनी ‘सुपर डूपर’ आणि ‘बाप्या’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. गतवर्षी प्रदर्शित झालेला दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांचा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट कान्स फिल्म महोत्सवात झळकला होता. त्याचबरोबर त्यांचा ‘आदिशेष’ हा आगामी चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लेखक, दिग्दर्शक आणि सिनेनाट्य अभिनेता म्हणून अमोल रेडीज यांनी महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातून रंगभूमीवर प्रवास सुरू करत त्यांनी एकांकिका स्पर्धा, एकपात्री अभिनय आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांतून आपली अभिनयकौशल्य सिद्ध केली. ‘जिहाद’, ‘मुखवटे’, ‘दि गेम ऑफ डेस्टिनी’ आणि ‘ईठ्ठला’ यांसारखी नाटके तसेच ‘चटका’ हा कथासंग्रह, अनेक शॉर्ट फिल्म्स आणि चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे. अभिनय आणि लेखन क्षेत्रात त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.
आपल्या या कलाप्रवासात दिग्दर्शक रमेश मोरे, कास्टिंग डायरेक्टर व दिग्दर्शक रोहन मापुस्कर, दिग्दर्शक जयंत गिलाटर, डॉ. भगवान नारकर आणि दिग्दर्शक असित रेडीज यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे अमोल रेडीज यांनी सांगितले.

