(देवळे / प्रकाश चाळके)
कुवे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने विविध विकासकामे मार्गी लावली जात असून, कुवे येथे बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन तसेच कुवे नगरपंचायत कार्यालयाचा शुभारंभ आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुवे परिसरातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी तसेच स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लांजा येथे जावे लागू नये आणि त्यांच्या हक्काच्या सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कुवे येथे नगरपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासन अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता, गटारे, पथदिवे तसेच इतर विकासकामांना गती देण्यात नगरपंचायत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार किरण सामंत यांनी कुवेच्या विकासाबाबत ठाम भूमिका मांडली. “कुवेवासीयांचे कोणतेही काम थांबणार नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे. कुवेच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
कुवे परिसरातील नागरिकांनी मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल. विकासकामांच्या बाबतीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवून काम केले जाईल, असेही आमदार सामंत यांनी स्पष्ट केले.
कुवे येथे उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहामुळे ग्रामस्थांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. बैठका, महिला बचतगटांचे कार्यक्रम, युवकांचे उपक्रम, सामाजिक कार्यक्रम, शासकीय जनजागृती कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होणार आहे. या सुविधेमुळे कुवे परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कुवे येथे नगरपंचायत कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांना प्रशासकीय पातळीवर अधिक वेगाने प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. विविध दाखले, स्थानिक विकासकामांशी संबंधित बाबी, नागरी सुविधा आणि इतर प्रशासकीय कामांसाठी आवश्यक त्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
“जनतेच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी वारंवार हेलपाटे मारू नयेत, त्यांचे प्रश्न त्यांच्या परिसरातच सोडविले जावेत, हा विकासाचा मुख्य उद्देश आहे. कुवेचा विकास हा केवळ एका भागाचा विकास नसून, येथील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे,” असे आमदार सामंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे कुवे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात कुवेच्या विकासाला आणखी गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास विधानसभा क्षेत्र प्रमुख राजु कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्षा सावळी कुरुप, उपनगराध्य बाबा लांजेकर, गटनेते योगेश कावतकर, बांधकाम सभापती वैभव जोईल, पाणी सभापती गुल्ल्याशेठ नेवरेकर, सभापती-महिला बालकल्याण बालकल्याण प्रणाली तेली, प्रणिता बोडस, मुख्याधिकारी अभिजीत कुभार, नगरसेवक निधी गुरव, पंडरीनाथ मायशेट्ये, श्रध्दा तोडकरी, सुशिला कांबळे, सिध्देश भूवड, साक्षी मानकर, दूर्वाभाई शेट्ये, प्रांजली यादव, अनिल गुरव, नेहा रायडे, मधुरा लांजेकर, बापू जाधव, सचिन डोंगरकर, मनोहर बाईत, प्रसाद भाई शेट्टे, परवेश घारे, चंदन खालवीरकर, दिलीप मुजावर, आबा सुर्वे, श्याम खानविलकर, अशोक गुरव, जमीन मालक राडये कुटुंबीय तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी, कुवेवासी आणि अधिकारी-कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


