(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
अलोरे येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे आत्महत्या प्रकरणाने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील चौघांना अटक करण्यात आली असून, पोलिस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, फरार असलेल्या अन्य दोघांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
मुकुंद पालांडे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या चार पानी पत्रामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या पत्रामध्ये अनोखी अखिलेश खेडेकर, अखिलेश खेडेकर, धनंजय शेट्ये, आशिष सावंत, योगेश मोरे आणि वेदांत विजय टाकळे या सहा जणांची नावे नमूद करण्यात आली असून, आपल्या आत्महत्येस हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुकुंद यांचे वडील मुरलीधर पालांडे यांनी अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. फिर्यादीत संबंधित सहा जणांनी संगनमताने दमदाटी, मारहाणीचा प्रयत्न तसेच पैशांसाठी दबाव टाकत मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून मुकुंद यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून सोमवारी त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.
दरम्यान, या प्रकरणातील धनंजय शेट्ये आणि आशिष सावंत हे दोघेजण अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

