(रत्नागिरी)
लांजा शहरामध्ये महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारावा, या मागणीसाठी मंगळवारी लांजा बौद्धजन मंडळाच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी लांजा बौद्धजन मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोषजी जाधव साहेब, सचिव सचिन जाधव साहेब, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष खेत्रे साहेब, ज्येष्ठ समाजसेवक काका तोडणकर, प्रदेश उपाध्यक्ष राऊत साहेब, कोकण प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासमवेत विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीशी जोडलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, शोषित-वंचितांचे तारणहार आणि सामाजिक क्रांतीचे महान योद्धा होते. त्यांच्या विचारांचा जागर प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी लांजा शहरात त्यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी ही काळाची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी असा स्मारक पुतळा उभा राहिल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि सामाजिक सलोखा दृढ होईल. या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.