(पुणे)
भोर तालुक्यातील खुटवड वस्ती परिसरात पुणे-सातारा महामार्गालगत उभ्या असलेल्या एका संशयित कारमधून इसमाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राजगड पोलीस स्टेशन पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या महामार्गालगतच्या सर्विस रोडवर एक स्विफ्ट डिझायर कार (MH 46 CL 5952) दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभी असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. गाडीत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने नागरिकांना संशय आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशन चे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता गाडीमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून कारमधील आणि परिसरातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
राजगड पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण तपास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ही घटना खुटवड वस्ती येथील सर्विस रोडवर घडली असून परिसरात सध्या चर्चांना उधाण आले आहे.

