( रायगड )
खालापूर तालुक्यातील निगडोली गावात वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून हे दुहेरी हत्याकांड करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रायगड जिल्हा हादरला आहे. या घटनेत रघुनाथ दत्तू फराट (वय 75) आणि त्यांच्या पत्नी सुरेखा रघुनाथ फराट (वय 72) यांचा मृत्यू झाला आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून खालापूर पोलीस आणि इतर तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
मोबाईल बंद असल्याने मुलाला आला संशय
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतून सेवानिवृत्त झालेले रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट हे दोघेही निगडोली गावातील घरी एकटे राहत होते. त्यांची मुले खोपोली आणि खालापूर परिसरात वास्तव्यास आहेत. मंगळवारी दिवसभर रघुनाथ फराट यांचा मोबाईल बंद लागत असल्याने त्यांच्या मुलाला संशय आला. काहीतरी अघटित घडल्याची भीती वाटल्याने त्यांनी नातू आदित्य फराट याला गावाकडे पाठवले.
घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले आजी-आजोबा
आदित्य फराट यांनी घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय वाढल्याने त्यांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश केला. घरात जाताच आजी-आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. या घटनेनंतर त्याने आरडाओरडा केला आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. हल्लेखोरांनी रघुनाथ फराट यांचा धारदार शस्त्राने गळा चिरला होता, तर सुरेखा फराट यांच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर गंभीर वार करण्यात आले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर निगडोली गावात शोककळा पसरली आहे.
फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या दुहेरी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून घरातील आणि परिसरातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत असून घरफोडीच्या उद्देशाने हत्या झाली की जुन्या वादातून हा गुन्हा घडला, याचा तपास सुरू आहे.

