(ठाणे)
डोंबिवली मधील खंबाळपाडा परिसरात घर बांधकामाच्या वादातून शेजाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रताप चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आरोपी रोहित शेलार हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घराच्या बांधकामावरून सुरू होता वाद
मिळालेल्या माहितीनुसार, खंबाळपाडा येथे राहणाऱ्या चौधरी आणि शेलार कुटुंबांमध्ये घराच्या बांधकामावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी संध्याकाळी हा वाद विकोपाला गेला. वादाच्या भरात आरोपी रोहित शेलार याने प्रताप चौधरी यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रताप चौधरी गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर स्थानिकांनी प्रताप चौधरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर आरोपी रोहित शेलार घटनास्थळावरून फरार झाला.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलीस स्टेशन चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध दिशांना रवाना करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे.
खंबाळपाडा परिसरात वाढवला पोलीस बंदोबस्त
या हत्येनंतर खंबाळपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या हत्येमुळे स्थानिक रहिवासी हादरले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

