(नवी दिल्ली)
भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक मान्यता मिळत असून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत देशाने मोठी प्रगती साधली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने आज (१ डिसेंबर) रोजी जाहीर केलेल्या अहवालात जगातील टॉप-१०० शस्त्रनिर्मिती कंपन्यांमध्ये तीन भारतीय कंपन्यांचा समावेश झाला आहे. ही बाब भारतीय संरक्षण उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्याला अधोरेखित करणारी आहे.
SIPRI च्या ‘टॉप-१०० शस्त्रास्त्र व लष्करी सेवा कंपन्या – 2024’ अहवालानुसार, 2024 मध्ये जागतिक संरक्षण कंपन्यांचा एकत्रित महसूल ६७९ अब्ज डॉलर इतका विक्रमी पातळीवर पोहोचला. यामध्ये अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन, नॉर्थरोप ग्रुमन आणि जनरल डायनॅमिक्स या तीन दिग्गज कंपन्यांच्या महसुलात ३.८% वाढ होऊन तो ३३४ अब्ज डॉलर झाला.
टॉप-५मध्ये चार अमेरिकन कंपन्या
SIPRI च्या माहितीप्रमाणे, जागतिक स्तरावरील सर्वोच्च पाच शस्त्र उत्पादकांमध्ये चार कंपन्या अमेरिकन आहेत —
1. लॉकहीड मार्टिन
2. RTX
3. नॉर्थरोप ग्रुमन
4. जनरल डायनॅमिक्स
याशिवाय, ब्रिटनची BAE Systems ही कंपनी चौथ्या स्थानावर असून टॉप-५ मध्ये समाविष्ट असलेली एकमेव गैर-अमेरिकी कंपनी आहे.
जागतिक दर्जाचा दर्जा मिळवलेल्या भारतीय कंपन्या
भारतातील तीन नामांकित संरक्षण कंपन्यांनी यादीत स्थान मिळवत देशाचा गौरव वाढवला —
1. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) – ४४ वा क्रमांक
LCA तेजस फायटर जेटचे उत्पादन
2. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) – ५८ वा क्रमांक
रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम
3. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) – ९१ वा क्रमांक
युद्धनौका आणि पाणबुडी निर्मिती
अमेरिका पुन्हा अव्वल, भारताचा उदय
टॉप-१०० यादीत अमेरिकेच्या तब्बल ३९ कंपन्या असून त्यापैकी ३० कंपन्यांच्या महसुलात वाढ झाली आहे. जागतिक संरक्षण बाजारात अमेरिकेचे वर्चस्व कायम असले, तरी टॉप-१०० मध्ये तीन भारतीय कंपन्यांचे स्थान हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढते सामर्थ्य आणि आत्मनिर्भरतेचे द्योतक आहे.

