(नागपूर)
मानकापूर उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघाताने नागपूर शहर हादरले. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल व्हॅन समोरून येणाऱ्या स्कूल बसवर धडकली. या अपघातात 15 वर्षीय विद्यार्थिनी सानवी खोब्रागडे आणि व्हॅनचालक हृतिक कानोजिया यांचा मृत्यू झाला. हृतिकचा जागीच मृत्यू झाला, तर सानवीचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. सानवी ही भगवानदास पुरोहित विद्या मंदिर शाळा (भवन्स कोराडी शाखा) येथे नववीत शिकत होती. अपघातात अन्य आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून सर्वजण उपचाराधीन आहेत.
अपघाताची घटना
शुक्रवारी सकाळी विद्यार्थी घेऊन शाळेत जात असलेल्या व्हॅनची उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या नारायणा विद्यालयाच्या बसशी जोरदार टक्कर झाली. या धडकेत व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर बसमधील विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली, तर आजुबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. अपघातावेळी बहुतांश विद्यार्थी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, स्कूल व्हॅन चुकीच्या लेनमध्ये गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बसचालकानेही अपघात टाळण्याची संधी न मिळाल्याचे सांगितले. या अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहतूक ठप्प झाली होती.

