(नवी दिल्ली)
आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा फटका बसला आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ जाहीर केली आहे.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता २०३१ रुपयांवर पोहोचली आहे. १ मार्च रोजी ११४.५० रुपयांची वाढ झाल्यानंतर, १ एप्रिलपासून आणखी १९५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि खाद्यव्यवसायावर होण्याची शक्यता असून, येत्या काळात खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याचे संकेत आहेत.
दरम्यान, घरगुती ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ७ मार्च रोजी ६० रुपयांनी वाढल्यानंतर सध्या दिल्लीत हा सिलेंडर ९१३ रुपयांवर स्थिर आहे.
इराण-इस्रायल संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती आणि विनिमय दर यांचा विचार करून तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी दरांचा आढावा घेतात. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे मानले जात आहे.

