(मुंबई)
राज्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच कोकणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील तब्बल 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामे दिल्याने रायगड जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे विधान परिषद जागावाटपावरून महायुतीतही अंतर्गत नाराजी आणि रस्सीखेच वाढल्याचे चित्र दिसत आहे.
रायगड काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट
उरण येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्ष नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून महेंद्र घरत यांना दूर करण्यात आल्यानंतर आणि रायगड जिल्ह्याची उत्तर व दक्षिण अशा दोन भागांत विभागणी करण्यात आल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत सामूहिक राजीनामे सुपूर्द केले.
रायगड जिल्ह्याची पुनर्रचना; नव्या नियुक्त्यांनंतर वाद
के. सी. वेणुगोपाल यांनी रायगड जिल्हा काँग्रेसची पुनर्रचना करत उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील आणि दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र ठाकूर यांची नियुक्ती केली. काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षक रागिणी नायर यांच्या रायगड दौऱ्यानंतर संघटनात्मक बदलांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, महेंद्र घरत यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जोरदार खडाजंगी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या बैठकीतही मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल बैठकीला अनुपस्थित राहिले, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत तटकरे यांनी, “जेव्हा मला एकट्याला टार्गेट केलं जात होतं, तेव्हा माझ्यासाठी कोणी पुढे येऊन बोललं नाही,” असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यावर भुजबळ यांनी जुने विषय काढू नयेत असे सांगत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटकरे यांनी “तुम्ही ज्येष्ठ असूनही गप्प का राहिलात?” दादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवत असताना आम्ही दोघेच टिकेचे धनी का? असा थेट सवाल करत नाराजी उघडपणे व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी, माजी आमदारांची महत्वाची बैठक पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर सोमवारी आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिले. यावेळी तटकरे यांनी आपल्यावर आणि प्रफुल्ल पटेल या ज्येष्ठ नेत्यांवर तसेच पक्षावरही टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमचे समर्थन करत नसल्याची खंत व्यक्त केली.
प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. पण ते गैरहजर राहिले. त्यातच ज्येष्ठ नेत्यांना डावलेले जात असल्याची पक्षातील दुस-या फळीतील नेत्यांची भावना आहे. या घडामोडीमुळे शरद पवार यांना भेटण्यासाठी काही आमदार आणि तटकरे गेल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे.
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव
महायुती मध्ये विधान परिषदेच्या 17 जागांच्या वाटपावरून मोठी धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. भाजपला 12, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी 1 जागा देण्याचा फॉर्म्युला चर्चेत असल्याने मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. विशेषतः नाशिक, रायगड आणि जळगाव या जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
शिंदे नाराज? ‘वर्षा’वर दोन तास खलबतं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक आणि जळगावच्या जागांसाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी तब्बल दोन तास बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने महायुतीतील अंतर्गत नाराजी आणखी चर्चेत आली आहे.

