(रायगड)
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाडा गावात घरात घुसून महिलेला बांधून जबरी चोरी केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १ लाख १२ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
महिलेला बांधून दागिने लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, खारपाडा गावातील अर्चना गजानन घरत यांच्या घरात अल्पवयीन संशयितांनी जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी महिलेला ढकलून तिच्या साडीने तोंड आणि मान बांधली. त्यानंतर घरातील सुमारे १,१२,४०० रुपयांचे सोन्याचे दागिने जबरीने चोरी करून दोघांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच Pen Police Station येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
ग्रामस्थांच्या सतर्कतेने संशयित पकडला
दरम्यान दुसमनी आणि खारपाडा गावातील ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे दागिने पंचनामा करून जप्त केले. चौकशीदरम्यान हा संशयित अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा दुसरा साथीदार पनवेल दिशेने पळून गेल्याची माहिती समोर आली.
दुसरा संशयित नवी मुंबईतून ताब्यात
यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधमोहीम राबवली. अखेर दुसऱ्या संशयितालाही नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तपासात तोही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही विधीसंघर्षित बालकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी कर्जत येथील निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.
1.12 लाखांचे दागिने हस्तगत
या प्रकरणात चोरी गेलेले १ लाख १२ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

