(नवी दिल्ली)
बिहार विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली असून, या भेटीनंतर अनेक राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवार (दि. 12 डिसेंबर) रोजी नवी दिल्लीतील 10 जनपथ येथे राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यात सुमारे दीड तास अनौपचारिक पण महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या. ही भेट अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली असली, तरी तिचे राजकीय पडसाद आता स्पष्टपणे उमटू लागले आहेत.
या चर्चेदरम्यान प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरण कशा स्वरूपात होऊ शकते, तसेच त्याची प्रक्रिया काय असू शकते, यावर प्राथमिक पातळीवर विचारमंथन झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील सध्याची राजकीय स्थिती, बिहार निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाची भूमिका, एसआयआर प्रकरण, कथित मतांची चोरी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाबसह अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुका, या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
काँग्रेस मजबूत करण्याचा जुना प्रस्ताव
प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांचे संबंध गेल्या काही वर्षांत चढ-उताराचे राहिले आहेत. २०२१ मध्ये प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला देशभरात पुन्हा मजबूत करण्यासाठी एक व्यापक रणनीती प्रस्तावित केली होती. त्यानंतर २०२२ मध्ये 10 जनपथ येथे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर त्यांनी सविस्तर सादरीकरण केले होते.
त्यानंतर काँग्रेसने २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी स्थापन केलेल्या विशेष टीममध्ये प्रशांत किशोर यांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले नव्हते. त्यामुळे काँग्रेस-प्रशांत किशोर यांच्यातील सबंध अर्धवट अवस्थेतच राहिले होते.
आता बिहार विधानसभा निवडणुकीतील अपयश, जनसुराज पक्षाची मर्यादित कामगिरी आणि राहुल गांधींसोबत झालेली ही दीर्घ व महत्त्वपूर्ण भेट, यामुळे प्रशांत किशोर काँग्रेससोबत नव्या भूमिकेत सक्रिय होणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या भेटीचे राजकीय परिणाम आगामी काळात अधिक स्पष्ट होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

