(रत्नागिरी)
राज्यभरात पेट्रोल आणि डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना रत्नागिरीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगेत उभे राहत असताना, जयगड समुद्र परिसरात एका मच्छिमारी बोटीत मोठ्या प्रमाणात इंधनाचा साठा आढळून आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी कस्टम विभागाने मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा इंधनसाठा जप्त केला आहे.
‘शहाना’ बोटीवर कस्टम विभागाची धाड
कस्टम विभागाने कारवाई केलेल्या मच्छिमारी बोटीचे नाव ‘शहाना’ असल्याची माहिती समोर आली आहे. जयगड समुद्रात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाने संबंधित बोटीची झाडाझडती घेतली. या तपासादरम्यान बोटीमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल आणि इंधनसाठा आढळून आला. राज्यात इंधनटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना समुद्रात उभी असलेल्या बोटीत एवढा मोठा साठा नेमका कशासाठी ठेवण्यात आला होता? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
30 हून अधिक इंधन बॅरल जप्त
कस्टम विभागाच्या तपासात संबंधित बोटीवर इंधनाचे 30 हून अधिक बॅरल आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही बोट पडवे गुहागर परिसरातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बोटीवरील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील तपासासाठी रत्नागिरी येथे आणण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
इंधनसाठ्यामागे साठेबाजीचा संशय
राज्यात अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे लाखोंचा साठा लपवून ठेवण्यात आल्याने साठेबाजी आणि काळाबाजाराचा संशय अधिक गडद झाला आहे. विशेष म्हणजे मच्छिमारी हंगाम संपत आला असताना बोटीवर एवढा इंधनसाठा का ठेवण्यात आला होता, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.
पुढील कारवाईकडे लक्ष
रत्नागिरी कस्टम विभागाने संबंधित बोट ताब्यात घेण्यात आली असून इंधनसाठा नेमका कुठून आणला गेला, त्याचा वापर कशासाठी होणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणात कस्टम विभाग पुढे कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

