(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दिव्यांग बांधवांवरील छळ, हिंसा, भेदभाव तसेच हक्क नाकारणाऱ्या घटनांवर शून्य सहनशीलतेची भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने आज सोमवारी (दि. १५ डिसेंबर) जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन सादर करण्यात आले.
राज्य शासनाने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार दिव्यांग कल्याण विभागाने लागू केलेल्या एकसमान कार्यपद्धती (SOP) नुसार दिव्यांग व्यक्तींवरील छळ, मारहाण, भेदभाव, शोषण व हक्क नाकारणे हे गंभीर गुन्हे ठरविण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण व शहरी भागांत दिव्यांग व्यक्तींना अपमान, अडथळे, धमक्या तसेच मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागत असल्याची बाब निवेदनातून अधोरेखित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलास विशेष आदेश जारी करणे, प्रत्येक पोलिस ठाण्यात दिव्यांग संरक्षण नोंदणी सुरू करणे, तक्रारींवर २४ तासांत प्राथमिक चौकशी, पीडित दिव्यांगांसाठी तातडीचे संरक्षण उपाय, FIR नोंदविण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, तसेच जिल्हास्तरावर विशेष पोलिस मॉनिटरिंग सेल स्थापन करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. याशिवाय ग्रामपातळीवर जनजागृती व समुपदेशन मोहीम राबविण्याचे आवाहनही करण्यात यावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान चर्चेवेळी दिव्यांग बांधवांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी त्यांच्या मागण्यांवर तातडीने ठोस भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना स्पष्ट आदेश देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्याचे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हा प्रमुख राकेश कांबळे यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादामुळे दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

अधिकाराच्या खुर्चीपेक्षा माणुसकीला दिलेले प्राधान्य
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे पदभार स्वीकारल्यापासून रत्नागिरी पोलिस दलाकडून प्रभावी व संवेदनशील कारभार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. विशेष बाब म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ प्रशासकीय निर्णयांनी नव्हे, तर मानवतेच्या कृतीतून आपली ओळख निर्माण केली आहे, याचे जिवंत उदाहरणही घडून आले. दिव्यांग बांधव पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करताच, अधिकाराच्या खुर्चीवर बसून राहण्याऐवजी पोलिस अधीक्षक बगाटे हे स्वतः उभे राहिले, पुढे आले आणि सन्मानाने त्यांचे स्वागत केले. तो केवळ औपचारिक क्षण म्हणता येणार नाही, तर अधिकारापेक्षा माणूस मोठा हा संदेश त्यांनी कृतीतून दिला आहे. तसेच त्यांनी बसलेल्या दिव्यांग बांधवांकडून मागण्यांचे निवेदन देखील स्वतः उभे राहून आदराने स्वीकारले. सत्तेचा अधिकार हातात असताना संवेदनशीलता हरवत चालली आहे, अशी तक्रार अनेकदा ऐकू येते. मात्र रत्नागिरीत घडलेला हा प्रसंग त्या समजुतीला छेद देणारा ठरला आहे.

