( सातारा )
आंबेनळी घाट येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्हा सुन्न झाला आहे. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील 1200 फूट खोल दरीत कार कोसळून आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी पहाटे आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये हृदयद्रावक वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. विशेष म्हणजे आसगाव गावातील पाच जिवलग मित्रांच्या चिता एकाचवेळी पेटल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले.
आसगावमध्ये पाच मित्रांवर सामूहिक अंत्यसंस्कार
अपघातात मृत्युमुखी पडलेले आदित्य साळुंखे, महेश पवार, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे आणि अंश चव्हाण या पाच जिवलग मित्रांवर आसगाव येथे मध्यरात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील अरुंद रस्ते, घरांचे उंबरठे आणि स्मशानभूमीकडे जाणारे मार्ग अश्रूंनी ओले झाले होते. “कालपर्यंत हसतखेळत फिरणारी पोरं आज कायमची शांत झाली,” या शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाचही तरुणांची घरं एकमेकांच्या अगदी जवळ असल्याने संपूर्ण गल्लीतील आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. 48 तास उलटल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह थेट ट्रॅक्टरमधून स्मशानभूमीत आणले. आधीच सरण रचून तयार ठेवण्यात आली होती. मध्यरात्री एकाचवेळी पाच चिता पेटल्या आणि त्या ज्वाळांमध्ये अनेक स्वप्नंही कायमची विरून गेली.
22 तासांच्या रेस्क्यूनंतर मृतदेह बाहेर
आंबेनळी घाट दरीत कोसळलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी तब्बल 22 तास रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी अथक प्रयत्नांनंतर सोमवारी रात्री आठही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
तरुणांच्या स्वप्नांचा दुर्दैवी अंत
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अनेक तरुण आपल्या कुटुंबाचा आधार होते.
- महेश पवार हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो मराठी मालिकांसाठी शूटिंग आणि फोटोग्राफीचे काम करत होता.
- रितेश लोखंडे हा पोलीस भरतीसाठी साताऱ्यातील अकॅडमीत सराव करत होता.
- सुहास लोखंडे याला रिलस्टार बनण्याचे स्वप्न होते आणि तो त्यासाठी तांत्रिक शिक्षण घेत होता.
- आदित्य साळुंखे साताऱ्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. वीस दिवसांपूर्वीच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते.
- अंश चव्हाण हा देखील एकुलता एक मुलगा होता. तो मूळचा बोरगाव, चिपळूण येथील असून सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. आसगाव हे त्याचे आजोळ होते.
हे सर्व मित्र गावातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असायचे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
मर्ढे आणि खटाव गावही शोकमग्न
मर्ढे येथे निखिल शिंगटे आणि उत्कर्ष शिंगटे या दोन जिवलग मित्रांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. कृष्णाकाठच्या या गावात त्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. तर खटाव येथे संदीप काटकर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश आणि ग्रामस्थांचे अश्रू पाहून संपूर्ण परिसर भावूक झाला होता.
सातारा जिल्ह्यावर शोककळा
आंबेनळी घाट दुर्घटनेने केवळ आठ कुटुंबांवरच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयात आयुष्याची अनेक स्वप्नं पाहणाऱ्या मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे.

