( चिपळूण )
चिपळूण शहरातील भाजी मंडईच्या पाठीमागील रस्त्यावर काल (रविवारी) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. कार रिव्हर्स घेत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट शिवनदीच्या पात्रात जाऊन अडकली. सुदैवाने नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटले
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालकाने भाजी मंडईच्या मागील बाजूस कार उभी केली होती. खरेदी करून परतल्यानंतर कार रिव्हर्स घेत असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्षणात कार रस्त्यालगतून घसरत शिवनदीच्या पात्रात कोसळली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कारचे मोठे नुकसान, चालक सुखरूप
ही घटना सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रात अडकलेली कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. नदीतील चिखलामुळे कारचे मोठे नुकसान झाले असले तरी चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
संरक्षण भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
चिपळूण नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी शिवनदी पात्रालगत संरक्षण भिंत उभारली आहे. मात्र, ही भिंत ज्या ठिकाणी संपते त्याच भागात ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर नदीपात्राच्या पुढील भागातही संरक्षक भिंत उभारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

