(रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील दुर्वास पाटील याने केलेल्या खुनांच्या प्रकरणांनी राज्य हादरले असतानाच खुनांचे कट रचले जाणारे आणि रक्तरंजित घटनांना साक्षी असलेला सायली देशी बार अखेर बंद करण्यात आला आहे. जयगड पोलिसांच्या हलगर्जीवर सातत्याने टीका होत असताना हा बार चालू असल्याने संताप व्यक्त केला जात होता. अखेर उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर बार सील झाल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी दुर्वास पाटीलची प्रेयसी भक्ती मयेकरला सातत्याने फोन करणाऱ्या सीताराम वीरचा खून हा थेट या बारमध्येच झाला. काठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत सीतारामला ठार करण्यात आले. याच बारमध्ये दुर्वास पाटील, त्याचा साथीदार विश्वास पवार हे एकत्र बसून पुढचे कट आखत होते. सीताराम वीरचा बेदम मारहाणीतून खून, राकेश जंगमचा काटा काढण्याची योजना आणि प्रेयसी भक्ती मयेकरचा खून या सगळ्याचे गुप्त नियोजन हाच बार होता.
तब्बल तीन खून करूनही आरोपी दुर्वास पाटीलसह त्याचे साथीदार कोठडीत असताना त्याचा बार मात्र पूर्ववत सुरू होता. तसेच या प्रकरणात जयगड पोलिसांवर आधीपासूनच संगनमताचे आरोप होत आहेत. या खुनांच्या साखळीने जनतेमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अगदी एसपी नितीन बगाटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील ‘बार अजूनही सुरू कसा?’ हा सवाल थेट उपस्थित झाला होता. यावेळी अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे एसपी बगाटे यांनी सांगितले होते. या बारवर अखेर तातडीने कारवाई करण्यात आली असून पोलिस विभागाच्या अहवालावरून उत्पादन शुल्क विभागाने सायली बार सील केला आहे.
दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि अन्य साथीदार आज पोलिस कोठडीत असले तरी लोकांच्या मनात अजूनही अस्वस्थता आहे. फक्त बार सील करून प्रकरण संपले का? पोलिसांच्या निष्काळजीपणाला जबाबदार कोण ठरवणार? असा सर्रास सवाल जनतेमधून विचारला जात आहे. रत्नागिरीतला हा रक्तरंजित खूनकांड आता फक्त बार बंदीपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर डाग आणणारा ठरत आहे. थोडक्यात, खूनखराब्याचा अड्डा ठरलेला सायली बार अखेर सील झाला आहे. परंतु दुर्वास पाटीलच्या निर्दयी खूनी साम्राज्याला हातभार कोणाचा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

