(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथील नामवंत व्यवसायिक प्रकाश गिरीधर उर्फ नाना डोर्लेकर यांचे रविवारी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते अवघ्या ४३ वर्षांचे होते.
नाना डोर्लेकर यांनी शून्यातून विश्व निर्माण करताना आपल्या व्यवसायामध्ये लक्षणीय प्रगती केली होती. त्यामध्ये त्यांनी मालगुंड सारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी हार्डवेअर व्यवसाया मध्ये आपला विशेष ठसा उमटवला होता. त्यानंतर स्वतःच्या गावामध्ये मासेमारी आणि इतर व्यवसायांमध्ये आपले नावलौकिक प्राप्त करीत गणपतीपुळे सारख्या मोठ्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रचौपाटीवर पर्यटनाच्या दृष्टीने वॉटर स्पोर्ट व्यवसाय सुरू करून आपले नाव पुन्हा नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते.
“नाना” या टोपण नावाने ते सर्वत्र लोकप्रिय होते.तसेच अतिशय शांत, संयमी आणि इतरांशी मिळून मिसळून वागणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी परोपकारी वृत्तीने सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी आपला मोठा मित्रपरिवार जोडला होता.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेक ठिकाणाहून त्यांचे मित्र मंडळी, नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्यांच्या अंतिम अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच संपूर्ण वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, खंडाळा,जयगड आदी भागातून तीव्र शोक आणि हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहीण व अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

