(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी क्रमांक २ ते तिसंग नदी मार्गावरील धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्याच्या कामाला अखेर वेग आला असून, गावचे उपसरपंच प्रकाश पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे ग्रामस्थ, प्रवासी तसेच वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जानेवारी २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा एमआयडीसीच्या सेस फंडातून या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले होते. रस्ता मजबूत आणि दर्जेदार तयार झाला असला तरी साईड पट्ट्या भरण्याचे काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच-सखल भाग निर्माण झाल्याने दुचाकी, रिक्षा, टेम्पो तसेच अन्य वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग अधिक धोकादायक बनला होता.
या समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही काम मार्गी लागत नव्हते. अखेर पंचायत समिती सदस्या सौ. अनुष्का अभय खेडेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सदस्य अभय खेडेकर यांनी या प्रश्नात लक्ष घातले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कळझोंडी गावचे उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी पुढाकार घेत साईड पट्ट्या भरण्याचे काम स्वतःच्या देखरेखीखाली सुरू केले आहे.
गेल्या चार दिवसांपासून हे काम वेगाने सुरू असून, या मार्गावरून बारमाही एसटी वाहतूक, रिक्षा, दुचाकी तसेच इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरू असते. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. साईड पट्ट्या भरण्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू असल्याने ग्रामस्थ, एसटी चालक, प्रवासी तसेच खाजगी वाहन चालकांनी समाधान व्यक्त करत कामाचे कौतुक केले आहे. ऐन पावसाळ्यापूर्वी हे काम हाती घेतल्याबद्दल उपसरपंच प्रकाश पवार यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
या कामाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या सौ. अनुष्का खेडेकर, आगरनरळ गावचे माजी सरपंच तथा प्रशासक अभय खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते विनायक शिंदे, महादेव आग्रे, संदीप पवार आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.

